UN Report : भारत चीनलाही मागे टाकणार, 8 वर्षातच "सर्वाधिक लोकसंख्येचा" देश ठरणार
नवी दिल्ली - देशातील वाढती लोकसंख्या ही भारतासमोरील सर्वात मोठी समस्या बनत चालली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरिकांना सोयी सुविधा पुरविताना सरकारला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या, जगातील क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला देश म्हणून भारताचा नंबर लागतो. तर, या यादीत चीन अग्रस्थानावर आहे. मात्र, लवकरच लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला मागे टाकणार असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार पुढील आठ वर्षात भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनणार आहे. दरम्यानच्या काळात चीनने काही कडक नियम बनवून आणि जनजागृतीद्वारे आपल्या देशाची लोकसंख्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे, आगामी काही वर्षात चीनच्या लोकसंख्येत 31.4 मिलियन्स घट होईल किंवा 2019 ते 2050 या कालावधीत चायनिज लोकसंख्येत 2.2 टक्क्यांची घट होणार आहे.