फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात पुणे झाले उणे
पुणे: राज्याच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्यागिक विकासामध्ये पुणे शहराला अत्यंत महत्व आहे. तसेच मुंबईनंतर सर्वांत मोठे शहर म्हणून देखील पुण्याचा नंबर लागतो. पुणेकरांनी देखील सन २०१४ निवडणुकीत आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश दिले, असे असताना मंत्री मंडळाच्या विस्तारामध्ये पुण्याला एकही मंत्री पद देण्यात आले नाही. यामुळे पुणेकरांवर मोठा अन्याय झाला असून, याचा शहराच्या विकासावर मोठा परिणाम होणार असल्याची टिका विरोधकांनी केली आहे.
देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदार संघातून भाजपचे गिरीश बापट खासदार म्हणून निवडून आले. यामुळे बापट यांनी राज्याच्या मंत्री मंडळाचा व पुण्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनाम दिला. बापट यांच्या राजीनाम्यानंतर मंत्री मंडळाच्या विस्तारामध्ये पुण्यात कुणाला मंत्रीपदाची संधी मिळणार यांची रोजदार चर्चा रंगली होती. यामध्ये प्रामुख्याने सलग तीन वेळा निवडून आलेल्या माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर आणि योगेश टिळेकर यांना मंत्री मंडळामध्ये संधी मिळेल अशी अपेक्षा होती. यामध्ये पहिल्यावेळी संधी हुकलेल्या मिसाळ मंत्रीपद मिळण्यासाठी अधिक दावेदार होत्या. परंतु रविवारी झालेल्या मंत्री मंडळाच्या विस्तारामध्ये बापटाच्या जागी पुण्याला मंत्री देणे सोडाच राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा देखील राजीनाम घेण्यात आला. यामुळे पुणेकरांनी भरभरुन यश देणा-या भाजपने पुणेकरांना मंत्री मंडळाच्या विस्तारामध्ये ठेंगा दाखविला आहे.